पुणे, (सुधीर खोमणे, प्रतिनिधी): न्हावरे येथील विद्यार्थिनी आकांक्षा कांडगे हिने वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच नुकतीच महाराष्ट्र शासनाची मोडी लिपी परीक्षा उत्तीर्ण केली. या परीक्षेमुळे तिला शासनाचे अधिकृत प्रमाणपत्र मिळाले असून, मोडी लिपीतील कागदपत्रे आणि पत्रव्यवहाराच्या माध्यमातून तिला तिचे पहिले मानधन मिळाले. परंतु आकांक्षाने हे मानधन स्वतःसाठी न वापरता, अनाथांसाठी काम करणाऱ्या 'शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्ट, पुणे' या संस्थेला दान करून एक आदर्श पायंडा घालून दिला आहे.
आकांक्षाने आपले पहिले मानधन शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टकडे सुपूर्द केले. ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष प्रा. यशवंत गोसावी यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
याप्रसंगी शिवनिश्चल ट्रस्टचे अध्यक्ष यशवंत गोसावी यांनी आकांक्षा आणि तिच्या संपूर्ण परिवाराचे विशेष आभार मानले. ते म्हणाले, "आकांक्षा आणि तिच्या परिवाराने समाजासमोर एक सुंदर पायंडा उभा केला आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुले ही सुद्धा आपलीच भावंड आहेत, ही भावना नव्या पिढीच्या मनात रुजणे अत्यंत गरजेचे आहे आणि हे काम कांडगे परिवाराने केले आहे."
यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये पूनमताई गोसावी (सदस्य, शिवनिश्चल सेवाभावी संस्था), संजय गायकवाड सर आणि संभाजी कांडगे (किसान युवा क्रांती संघटना, उपाध्यक्ष, शिरूर तालुका) यांचा समावेश होता. आकांक्षाच्या या कृतीने समाजाला एक प्रेरणादायी संदेश दिला आहे.
Social Plugin